साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | देशातील ४ राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान झाले असून येत्या काही दिवसात याचे निकाल देखील येणार आहे त्यापूर्वीच ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशइतके स्वच्छ झालं आहे. तसेच, मिझोरामध्ये प्रादेशिक नॅशनल फ्रंट आणि अन्य पक्षांत लढाई आहे. या लढाईत काँग्रेसचे अस्तित्व आहे. पण, मिझोराममध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपचा विजय होणार नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
राऊत पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा हे गेला महिनाभर राजधानी दिल्लीला वाऱ्यावर सोडून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ तसेच तेलंगणाच्या प्रचार दौऱ्यात गुंतून राहिले. देशासमोर अनेक समस्या आहेत, पण पाच राज्यांच्या निवडणुका जिंकणे यापलीकडे मोदी-शहांचे मन फिरताना दिसत नाही. तेलंगणात भाजप स्पर्धेत नाही. भाजपने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून के. चंद्रशेखर राव आणि एमआयएमला मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश दिला आहे. पण, काँग्रेसला मतदान करू नये, असेही सांगण्यात आले आहे. तेलंगणात भाजपने ही रणनिती आखली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसने मुसंडी मारली असून चांगला निकाल समोर येऊ शकतो.