साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक समाजाचे आरक्षणासाठी प्रश्न पेटत असतांना आता धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये; यासह विविध प्रमुख मागण्यासाठी आज आदिवासी समाजाच्यावतीने मुंबई- नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने आदिवासी बंधू भगिनींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
आदिवासी आरक्षण बचाव समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. आमच्या ४४ जातींमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये; अन्यथा २५ आमदार आणि चार खासदार राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा या आंदोलनात देण्यात आला. शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन मोर्चा काढण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी जाम झाली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनात शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शासनाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले, तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणी बंद करू; असा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला आहे.







