बनावट पावत्यांच्या आधारे वाळू वाहतूक केली किती..
गुन्हे दाखल होण्याची ठेकेदार व पाटबंधारे अभियंत्यांना वाटू लागली भीती..
Bodwad Lift Irrigation Scheme साक्षीदार न्युज । सुनिल भोळे। बनावट पावती पुस्तकांद्वारे हजारो ब्रास वाळू वाहतूक करण्यात आल्याचा आरोप असलेल्या बोदवड उपसा सिंचन योजना प्रकल्पात ढवळाढवळ करण्यात तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेला एक वरिष्ठ अभियंता असल्याची चर्चा आहे.या अभियंत्याला राजकीय पाठबळ असल्याचीही ओरड आहे.
वासरात लंगडी गाय शहाणी असल्या प्रमाणे बोदवड उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक बाबींचे मला एकट्यालाच ज्ञान आहे असा समज झालेल्या या महाशयाने अत्यंत चलाखीने पाटबंधारे महामंडळातील काही विशिष्ट अभियंत्यांना हाताशी धरून बोदवड उपसा सिंचन प्रकल्पाला आपल्या तालावर हवे तसे कामे करण्यात पुढाकार घेतला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
जुनोने धरणाच्या ठिकाणी वाळू वाहतूक न करता वाघूर धरणाच्या जवळ असलेल्या एका रिसॉर्ट जवळ या वाहनातून रेती खाली करण्यात आल्याची चर्चा आहे. यातील सत्यता तपासण्यासाठी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची जीपीएस तपासणी करणे गरजेचे आहे. Bodwad Lift Irrigation Scheme
जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तक्रारीनंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी बोदवड उपसा सिंचन योजना प्रकल्पासाठी राखीव ठेवलेले धरणगाव तालुक्यातील आव्हाणी राखीव गटातून बनावट बारकोड असलेल्या बोगस पावती पुस्तकांद्वारे वाळू वाहतूक करण्यात आल्याच्या तक्रारीवर एरंडोल प्रांताधिकार्यांचे अध्यक्षतेखाली तीन सदस्य चौकशी समिती नेमली होती. ही चौकशी समिती लवकरच आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून बनावट पावती पुस्तकांद्वारे वाळू वाहतूक करणाऱ्या व त्यातून मलिदा लाटणाऱ्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.