साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | राज्यभरात दिवाळीचा उत्साह सुरु असतांना ठाणे शहरात मात्र अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहे. नुकतेच ठाणे शहरातील पाचपाखाडी परिसरातील सरीवर दर्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये अचानक आग लागली. या आगीत ११ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. याशिवाय ३ चारचाकी वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पार्किंगमध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे.
ठाणे शहरात दिवाळीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यामुळे शहरात एकाच दिवशी १५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. इमारतींमधील सदनिका, रस्त्यालगत असलेला कचरा तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. वाघबीळ, कळवा, ठाणे जिल्हा मनोरुग्णालयजवळील परिसर, पाचपाखाडी, हायलॅंड गार्डन, कचराळी तलाव, आझादनगर, रामनगर अशा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग तात्काळ विझविली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे बहुतांश ठिकाणी आग लागल्याची शक्यता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी फटाके फोडताना काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.