साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील महावीर नगरातील सुंदरम् अपार्टमेंमधील रहिवासी हर्षा प्रमोद कुळकर्णी (५२) यांची हरविलेल्या चावीचा गैरवापर करून घरातील कपाटातून २ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख ४५ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले ही घटना १९ रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान हर्षा कुळकर्णी यांचे घर बंद असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हरविलेल्या चावीचा वापर करत घर उघडून कपाटातून दोन लाख 32 हजार रुपये किमतीचे दागिने व रोख ४५ हजार रुपये चोरून नेले. कुळकर्णी या घरी आल्यानंतर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यानंतर त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे दिसले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.