साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना या अपघातामध्ये नियमित बसचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. असाच काहीसा अपघात बीड जिल्ह्यात घडला आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर -अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश गावाजवळ पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे ते नांदेड शयनगाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यावरून शेतात बस शिरली. या गाडीत पंचवीस प्रवासी प्रवास करत होते. सहा प्रवासी गंभीर जखमी आहेत, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यावेळी लिंबागणेश गावकऱ्यांनी तात्काळ मदत केली. या बस अपघातात अनिता विक्रम थोरात (वय ४०, रा.खडकीघाट) यांच्या कमरेच्या मणक्याला मार लागला आहे. विक्रम यदा थोरात (वय ५०) यांना व राधाकिसन श्रीहरी कदम (वय ४५) यांना डोक्याला मार लागला आहे. रघुनाथ कोंडीबा थोरात (वय ५०) याचे डाव्या हाताचे बोट तुटले असुन शिवशाला महादेव रासकर (वय ६०, रा.भारज) यांना पायाला मार लागला असुन त्यांना रूग्णवाहिकेतुन बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.