साक्षीदार | १२ नोव्हेबर २०२३ | दिवाळी सणानिमित्त अनेक व्यापारीनी आपल्या दुकानात सुकामेवा सह नमकीनसाठी वापरण्यात येणारे मसाले मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले असून बाजारात घेणाऱ्यांची देखील मोठी गर्दी होत आहे. अशाच एका दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन ४० हजारांच्या रोकडसह २० हजारांचा सुकामेवा व मसाले चोरुन नेले. ही घटना गुरवारी मध्यरात्रीच्या सुमारास दाणाबाजारात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश नगरात हरिचंद्र कन्हैयालाल ललवाणी (वय ५४) हे वास्तव्यास असून त्यांचे शहरातील दाणाबाजारात सतगुरु ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दिवाळी सणामुळे दुकानात सुकामेव्यासह इतर माल भरलेला आहे. दि. ९ रोजी रात्री ललवाणी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता, त्यांना दुकानाच्या भिंतीला भगदाड पडलेले दिसून आले. त्यांनी दुकानातील सामानाची पाहणी केली असता, त्यांना दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली ४० हजारांची रोकड व सुमारे २० हजार रुपये किंमतीचा सुकामेवा आणि मसाले चोरीस गेल्याचे लक्षात आले.
दुकानात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर ललवाणी यांनी लागलीच घटनेची माहिती शहर पोलीसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली, त्यानंतर हरिचंद्र ललवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बशीर तडवी करीत आहेत. रात्रीची गस्त वाढवा शहरात घरफोडीसह चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भरदिवसासह रात्रीच्या सुमारास घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.