साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असून अनेक मोठ्या शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव आपली परिवाराची दिवाळी दूर ठेवून कर्तव्य बजावीत असतांना दिसून येत आहे पण दुसरीकडे मात्र धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर मध्यरात्री उशिरा देवपूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा देखील मलिन झाली आहे.
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हा सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती.
याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कलम 354 A, 354 ब, 354 ड, 509, 506, 34 तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कलम 67,67 A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान या घटनेमुळे सध्या विविध चर्चा रंगल्या आहेत.