Jalgaon LCB | जळगाव । सुनिल भोळे । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्ह्यांची उकल करणे आणि राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, संघटना, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जनतेला सेवा देण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकावर असते. गेल्या काही दिवसांत या महत्त्वाच्या पदासाठी घाईच्या निर्णयांची मालिका सुरू असल्याने पोलीस प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे. आ.मंगेश चव्हाण यांनी मुद्दे उपस्थित केल्यानंतर झालेल्या संदीप पाटील यांच्या बदलीप्रमाणेच सध्याचे एलसीबी निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्तीही तात्पुरती असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पसंतीचा आणि स्थानिक जनसंपर्क दांडगा असलेला अधिकारी या पदावर असणे आवश्यक असल्याने लवकरच बदल होण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या तक्रारीनंतर तात्काळ कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेतील राहुल गायकवाड यांची नेमणूक केली होती. ही नियुक्ती गणेशोत्सव आणि ईद मिलादसारख्या महत्त्वाच्या सणोत्सवांच्या काळात आवश्यक झाल्याने झाली असल्याचे बोलले जाते. मात्र, सणोत्सव आटोपले असल्याने ही नियुक्ती केवळ तात्पुरती असल्याची चर्चा जोर धरत आहे. आता १५ दिवसांतच बदलीची शक्यता वर्तवली जात असून, याचा अर्थ गायकवाड यांची नियुक्ती अस्थायी होती यावर शिक्कामोर्तब होत आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने रणनीतिक बदल
आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलसीबी निरीक्षक पदासाठी स्थानिक जनसंपर्क व पसंतीचा अधिकारी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे जिल्ह्याला व पोलीस प्रशासनाला सांभाळत पालकाची भूमिका बजावणारा अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते खात्याला न्याय देणारे आणि आपल्या लोकांना सांभाळून घेणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असल्याने, राहुल गायकवाड यांच्या जागी दुसरा अधिकारी नेमून ते त्यांचेही पुनर्वसन करतील, अशी अपेक्षा आहे.
चर्चेत ही नावे जोरात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदासाठी सध्या अनेक नावांवर चर्चा रंगली आहे. यापूर्वी जिल्ह्यात काम केलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, यावल पोलीस ठाण्याचे रंगनाथ धारबळे, अमळनेर पोलीस ठाण्याचे दत्तात्रय निकम, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रदीप ठाकूर, शहर वाहतूक शाखेचे पवन देसले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच, जिल्ह्यातून बदलून गेलेले पण जवळच कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या नावाचीही एलसीबीसाठी चर्चा आहे.
पोलीस प्रशासनातील हे बदल जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, निवडणूक काळात जनतेच्या विश्वासाला धक्का न लागता सर्वांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.