साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील मेहरूण तलावात छटपूजेनिमित्त आलेल्या २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली. मंगळवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास मेहरूण तलावात तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. रामबाबूराय जगनराय यादव (वय २५, रा. बिहार, ह.मु. सुप्रीम कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण तलावावरील गणेश घाट येथे रविवारी व सोमवारी उत्तर भारतीय संघातर्फे छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी मावळत्या तर सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी उत्तर भारतीयांची मोठी गर्दी झाली होती. छटपूजेनिमित्त रामबाबूराय यादव हा पुतण्यासोबत आला होता. मात्र, काही वेळानंतर काका गर्दीत कुठेतरी असेल म्हणून पुतण्या घरी निघून गेला. मंगळवारी नागरिकांना तलावाच्या काठावर मृतदेह तरंगताना दिसला.