Revenue Samadhan Camp Jalgaon जळगाव |साक्षीदार न्यूज | छत्रपती शिवाजी महाराजांच्या “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” या विचारातून प्रेरणा घेत शासन आज जनतेच्या दारी पोहोचत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील भोकर आणि आसोदा येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पूर्वी एखाद्या साध्या दाखल्यासाठी नागरिकांना तहसील, पंचायत समिती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता शासनाने “जनता शासनाच्या दारी उभी राहणार नाही, शासनच जनतेच्या दारी जाईल” या संकल्पनेतून महसूल समाधान शिबिर सुरू केले आहे.
ते पुढे म्हणाले की, एखाद्या गरीब कुटुंबाला घरकुल मिळणे, शेतकऱ्यांचा जमीन प्रश्न मार्गी लागणे किंवा विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळणे — या माध्यमातूनच शासनाच्या कामाचे खरे समाधान मिळते. गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचाही उल्लेख केला. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आसोदा येथे विद्यार्थ्यांची काव्यनाटिका
या शिबिराच्या निमित्ताने आसोदा येथे स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित काव्यनाटिका सादर केली. ग्रामीण जीवन, कष्टकरी संस्कृती आणि जीवनमूल्ये यांचे प्रभावी चित्रण विद्यार्थ्यांनी सादर केले. या सादरीकरणाला पालकमंत्र्यांसह उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
विविध योजनांचा लाभ
दोन्ही शिबिरांमध्ये कृषी, महसूल, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, महिला बचत गट आणि आरोग्य विभाग यांसह विविध विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
या शिबिरांमध्ये
-
रहिवास प्रमाणपत्र
-
डिजिटल 7/12
-
अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र
-
संजय गांधी व श्रावणबाळ योजना
-
विधवा पेन्शन योजना
-
दिव्यांग लाभार्थी योजना
-
जिवंत 7/12 वारस नोंदी
-
पोटखराब प्रकरणे
-
उत्पन्न दाखले
-
रेशन कार्ड
-
फार्मर आयडी
-
आयुष्मान कार्ड
यांसह विविध सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
आसोदा येथे 613 तर भोकर येथे 677 अशा एकूण 1290 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन
प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रस्ताविकातून अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार आणि उपशिक्षक सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार शीतल राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले.
मान्यवरांची उपस्थिती
भोकर येथे सरपंच प्रमिलाबाई सोनवणे, मंडळ अधिकारी आशिष वाघ, असोदा मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, बालाशेठ राठी, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, गोपालजी बाहू, डॉ. सत्वशील पाटील, भरत बोरसे, उप तालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, दत्तू आबा सोनवणे, किसन सोनवणे, छोटू सरकार, सुभाष बडगुजर, रमेश आप्पा पाटील, डॉ. दिलीप लाठी उपस्थित होते.
तर आसोदा येथे तुषार महाजन, रवींद्र देशमुख, खेमचंद महाजन, सुभाष महाजन, अनिल महाजन, किशोर चौधरी, गिरीश भोळे, अजय महाजन, उमेश बाविस्कर, महेंद्र नारखेडे, संजोग कोळी, बाळकृष्ण पाटील तसेच श्रीराम मंदिराचे ट्रस्टी, परिसरातील सरपंच, उपसरपंच, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








