साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | राज्यातील शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागण्याची वेळ येणार आहे. नुकतेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱया दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान तर दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या उपलब्ध केले जाणार आहे.
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारी दरम्यान तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून मिळणार्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत. अन्य वेबसाईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.