Children Theatre | जळगाव | साक्षीदार न्यूज । प्रभावी अध्यापनासाठी नाट्यशास्त्राचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांसाठी अभ्यास नाट्य कार्यशाळेचे आज (दि.१६) आयोजन करण्यात आले होते. बालनाट्याच्या क्षेत्रात पाच दशकांपासून कार्यरत असणारे पुणे येथील प्रकाश पारखी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शुभारंभानिमित्ताने व्यासपीठावर मार्गदर्शक प्रकाश पारखी यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव श्री. विनोद पाटील बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल व प्रमुख कार्यवाह विनोद ढगे उपस्थित होते. शिक्षकांच्या स्वागत गीताने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. या कार्यशाळेत नाट्यशास्त्राच्या माध्यमातून अध्यापन कौशल्यासह, विद्यार्थी – विद्यार्थिंनींचा आत्मविश्वास वाढवत त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे यादृष्टीने संवाद कौशल्य, नावीन्यपूर्ण विचार, उच्चारशास्त्र, अभिनय आदी अंगांचा विचार करत, नाटकाच्या माध्यमातून विषयाचे सुलभ आकलन कसे होईल यावर प्रकाश पारखी यांनी मार्गदर्शन केले. तसेच मार्गदर्शनानंतर शिक्षकांकडून प्रात्याक्षिकेही करवून घेतले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक व प्रशिक्षण विभाग प्रमुख श्री.किरण सोहळे मुख्याध्यापक श्री.संतोष चौधरी, श्री. हेमराज पाटील व बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.