Police Sub Inspector Arrests साक्षीदार न्युज । विश्वास वाडे । चोपडा बस स्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. विशेष म्हणजे, या टोळीत जालना येथील एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी एका प्रवाशाचे 35 हजार रुपये चोरणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर आणि चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बस स्थानकात सापळा रचला आणि आरोपींना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेने नागरिकांमध्ये संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करायचे, तोच जर गुन्हेगारीत सामील असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोपडा बस स्थानक परिसरात सातत्याने दागिने आणि रोख रकमेच्या चोऱ्या होत असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अभावामुळे चोरट्यांना मोकळे रान मिळत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच, त्यांनी इतर कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस स्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
चोपडा बस स्थानकात होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी, शेतकरी आणि शासकीय कर्मचारी यांसारख्या प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हातसफाई करतात आणि सहजपणे पसार होतात. अनेकदा पीडित प्रवासी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यास प्रशासकीय अडचणींमुळे निराश होऊन परततात. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने बस स्थानकातील चोऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
पालकांच्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलिस संरक्षण नाही
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ सुधारणा कायद्याच्या तरतुदींना दिली स्थगिती
१६ वर्षीय मुलीवर उपसरपंचाने केला अत्याचार , नवजात मुलीची विक्री