साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | गेल्या काही काळात कांद्याच्या दरात होत असलेल्या वाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने राखीव साठ्यातील कांद्याची २५ रुपये किलो या अनुदानित दराने किरकोळ विक्री करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफतर्फे संचालित किरकोळ विक्री दुकाने आणि मोबाईल व्हॅन, नाफेड केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांद्याची विक्री सुरू केली आहे. नाफेडने २ नोव्हेंबरपर्यंत देशाच्या २१ राज्यांतील ५५ शहरांमध्ये दुकाने आणि मोबाईल व्हॅन यांचा समावेश असलेली ३२९ किरकोळ विक्री केंद्र उभारली आहेत. एनसीसीएफने २० राज्यांतील ५४ शहरांमध्ये ४५७ किरकोळ विक्री केंद्र स्थापन केली आहेत.
त्याच धर्तीवर केंद्रीय भांडारतर्फे देखील ३ नोव्हेंबर २०२३ पासून त्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरू केली आहे, तर सफल मदर डेरी देखील या आठवड्याच्या शेवटी कांदा विक्रीला सुरुवात करणार आहे.
रब्बी आणि खरीप पिकांच्या दरम्यान कांद्याच्या दरातील हंगामी चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नंतर योग्य वेळी आणि लक्ष्यित पद्धतीने कांदा विक्रीसाठी काढता यावा म्हणून केंद्र सरकार रब्बी कांद्याची खरेदी करून त्याचा राखीव साठा ठेवत असते. या वर्षी कांद्याचा राखीव साठा ७ लाख मेट्रिक टनपर्यंत वाढवण्यात आला. वर्ष २०२२ – २३ मध्ये हा साठा केवळ अडीच लाख मेट्रिक टन इतका होता. आतापर्यंत ५.०६. लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.