साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात येत आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने प्रत्येक पिकाच्या उत्पादनात घट देखील झाली आहे तर आता कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कपाशीचे चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कपाशीचा एक- दोन वेचा झाल्यानंतर यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडण्यास सुरवात झाली आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे.
परभणी जिल्ह्यात कपाशीचा पेरा बऱ्यापैकी झाला आहे. परंतु लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन वर्षांत कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पावसाने मोठा खंड दिला. नगदी पीक असलेल्या कपाशीवर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.