साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांनीच फळ पीकविम्याची बनावट कागदपत्रे करून लाभ घेतला जात आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यास विलंब होत आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पक्षाचे नंदकुमार महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.
या वेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, की श्री.खडसे यांनी, आमदार पाटील यांनी तक्रार केल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप केला होता; परंतु प्रत्यक्षात श्री. खडसे यांनीच कृषिमंत्री मुंडे यांना पत्र दिले आहे. १३ ऑगस्ट २०२३ ला त्यांनी पत्र देऊन जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारावर फळ पीकविमा प्रस्ताव सादर करून फसवणूक केली जात आहे, या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. खडसे यांनी दिलेल्या या पत्रामुळे आता शासनाने चौकशी सुरू केली असून, त्यामुळे पीकविमा मिळण्यास विलंब होत आहे. खडसे यांनी स्वत: पीकविम्याबाबत तक्रार केली; परंतु आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांचा पीकविमा थांबविल्याचा खोटा आरोप केला होता.
यामुळे आपली मतदारसंघात विनाकारण बदनामी झाली; परंतु आता शेतकऱ्यांचा विमा मिळण्यात कोणी अडचण आणली, याचा पुरावाच आपण दिलेला आहे. शेतकऱ्यांना फळ पीकविमा मिळण्यास शासन सकारात्मक आहे; परंतु विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना फळ पीकविम्याची रक्कम निश्चित मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.