साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. आज आठवा दिवस असून सातव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पहाटेचे ५ वाजले होते. आरक्षणाचे स्वप्न दाखवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी तहान, भूक विसरून राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक येत होते. आतापर्यंत गाढ झोपेत होतो. आता कुठे जाग आली आहे. डोळ्यावरची झापड उघडणाऱ्या लढवय्याला पाठिंबा देण्यासाठी झेंडा हातात घेतला आहे. ‘आता नाही तर कधीच नाही, एकच मिशन मराठा आरक्षण’ या भावनेतून अंातरवाली सराटीत गर्दी वाढत अाहे.
सूर्य उगवला नव्हता तोपर्यंत आंतरवाली सराटीत राज्याच्या कानकोपऱ्यांतून येणारी गर्दी वाढतच होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अपेक्षा, जरांगे यांच्याविषयीची काळजी आणि आरक्षण मिळणार असल्याचा निर्धार जणू मनोज जरांगे यांना अधिक ताकद देत होता. येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भावनांचे काहूर, आरक्षण मिळवण्याची जिद्द असते. मात्र सात दिवसांपासून समाजासाठी अन्नत्याग केलेल्या मनोज जरांगेंना पाहिले की, आपसूकच अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. मायमाउल्या तर ढसाढसा रडायला लागतात. कुणी मामा म्हणत, तर कुणी दादा, कुणी लेक म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी शपथ घालतात, असे चित्र येथे दिसत आहे.