Jal Jeevan Mission | यावल | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेला पाणीपुरवठा प्रकल्प गेल्या वर्षभरापासून रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम अपूर्ण राहिल्याने “हर घर जल” ही योजना कागदावरच असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
गावासाठी सुमारे १ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम दीड ते दोन वर्षांपूर्वी सुरू झाले; मात्र सुरुवातीला काही प्रमाणात काम करून ठेकेदाराने काम अचानक बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असून पाण्याची टाकीही अधुरीच आहे. यामुळे संपूर्ण योजना ठप्प अवस्थेत आहे.
पाण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ
सध्या गावातील पाणीपुरवठा वीज कंपनीच्या लोडशेडिंगवर अवलंबून असून तोही अत्यंत अनियमित आहे. रात्रीच्या वेळेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात अनेकांना पाणी मिळत नसल्याने महिलांसह नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. “नळजोडणी”चे स्वप्न अजूनही अपूर्णच राहिले असून ग्रामस्थांना विहीर, बोअरवेल आणि टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
ठेकेदारावर मनमानीचे आरोप
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराकडून कामाबाबत हलगर्जीपणा होत असून गेल्या अनेक महिन्यांपासून काम पूर्णपणे बंद आहे. निधीअभावी काम थांबले असल्याचे कारण सांगितले जात असले तरी याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
सरपंचांची प्रतिक्रिया
ग्रामपंचायतीचे सरपंच अजय अडकमोल यांनी सांगितले की,
“गावासाठी मंजूर निधी असूनही काम थांबले आहे. पाइपलाईन, टाकी व इतर कामे अपूर्ण आहेत. हे काम तातडीने पूर्ण व्हावे, ही ग्रामस्थांची अपेक्षा आहे.”
योजनेचा उद्देश अपूर्ण
२०१९ मध्ये सुरू झालेल्या जल जीवन मिशन योजनेचा उद्देश प्रत्येक ग्रामीण घराला दररोज किमान ५५ लिटर स्वच्छ पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र दहिगावमध्ये हा उद्देश अद्याप साध्य झालेला नाही.
ग्रामस्थांचा इशारा
ग्रामस्थांनी ठेकेदारावर कारवाई करण्याची, प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची आणि नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. लवकरच काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दहिगावकरांचा सवाल:
“कोट्यवधी खर्च करूनही पाणी नाही… मग हा विकास नेमका कोणासाठी?”








