साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटाचा मेळावा दसऱ्याच्या दिवशी होत आहे पण शिंदे गटाच्या नेत्याच्या एका दाव्यामुळे यंदाचा दसरा व दिवाळीमध्ये अनेक राजकीय गोप्यस्फोट होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील काही नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहेत. हे नेते अजित पवारांच्या गटात जाणार आहेत. त्यामुळे यंदा दसरा व दिवाळीत मोठे धमाके होणार आहेत, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या पितृपक्ष संपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेना – भाजप व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यातच रिपाइं (आठवले) नेते रामदास आठवले यांनीही आपल्या पक्षासाठी 1 मंत्रीपद मागितले आहे. यामुळे विस्तारात कुणाला संधी मिळणार? याविषयी खमंग चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकील काही नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे. हे नेते लवकरच अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.