साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | सध्या कुणाला कधी व कसा मृत्यू येईल हे कुणाला हि समजत नाही, अनेक घटना सोशल मिडीयावर देखील व्हायरल होत असतात, अशीच एक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सतीफैल भागातील एका २७ वर्षीय युवकाचा डीजेच्या आवाजात सुरू असलेल्या मिरवणुकीत नाचताना कोसळून मृत्यू झाला. मृत युवकाचे मंगळवारी स्थानिक सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, युवकाच्या शवविच्छेदन अहवालावरील मत तज्ज्ञांनी राखून ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील युवराज ऊर्फ नटवर सुरेश यादव याला सोमवारी रात्री मिरवणुकीत नाचताना अस्वस्थ वाटू लागल्याने मृत्यू झाला. नाचताना भोवळ येऊन कोसळल्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धावपळ केली. परंतु, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. युवकाचा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांना भोवळ आली. तसेच डीजेवर वापरण्यात आलेल्या लेझर किरणांमुळे काहींना सोमवारी रातआंधळेपणाचा त्रास झाला.