साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील मराठा समाजाने अनेक राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे तर याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील काही भागात बसला आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असून, डॉक्टरांनी त्यांना काही दिवस घरात विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच ते त्यांचे दैनंदिन कार्यक्रम सुरू करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी दिली.
Train accident ; ब्रेकिंग न्युज ; दोन रेल्वेचा अपघात दहा ठार तर पन्नासहून अधिक जखमी
अजित पवार गेल्या दोन-तीन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली. राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने जोर पकडला आहे. राज्यातील विविध भागांत सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. शनिवारी, अजित पवार हे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नियोजित मोळी पूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, तेथील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना तेथे येण्यास मनाई केली होती. आमच्या विरोधानंतरही अजित पवार हे साखर कारखान्यावर आले तर आम्ही आमच्या पद्धतीने निषेध व्यक्त करू, अशी जाहीर भूमिका बारामतीतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर अजित पवार यांनी माळेगावचा कार्यक्रम रद्द केला होता.
दरम्यान, गेली दोन दिवस अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात न दिसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी दुपारी ‘एक्स’ वर ट्विट करून अजित पवार यांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाल्याची माहिती दिली. अजितदादा हे डेंग्यूने आजारी आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी उगाचच वेगवेगळ्या बातम्या पसरवू नये. अजित पवार पूर्ण बरे झाल्यानंतर ते त्यांचे दैनंदिन कार्यक्रम पुन्हा सुरू करतील, असे पटेल यांनी स्पष्ट केले.