साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | सध्या देशभर दिवाळी उत्सव सुरु झाला असून दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्यावर ग्राहकांचा अधिक कल असतो. सोनं-चांदीत गुंतवणूक करण्यासाठी खरेदीदार याच दिवसाची निवड करतात. अशातच दिवाळीपूर्वीच मागील दोन आठवड्यात सोन्याच्या भावात १२०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
२६ ऑक्टोबरला सोन्याचा भाव २४ कॅरेटनुसार ६२,११० रुपये इतका होता. तर आज सोन्याचा भाव ६०,९१० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजला जात आहे. इस्त्राइल हमास युद्धामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात फार मोठे नुकसान झाले नसले तरीही सोनं आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आखाती देशाच्या युद्धामुळे सोन्यासोबत हिऱ्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. युक्रेन- रशिया युद्धाच्या धक्क्यातून सोन्याचा बाजारात सावरत असताना गाझा पट्टीत युद्ध पेटले असून त्याचा परिणाम सोन्यावर दिसून आला.
दसऱ्यात सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच दिवाळीपूर्वी सोनं आणखी महगाणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५८५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६०,९१० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात ४४० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या (Silver) किमतीतही घट झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७३,२०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.