Jalgaon Cultural News |जळगाव | साक्षीदार न्यूज | गेल्या तब्बल ४८ वर्षांपासून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात बालनाट्य चळवळ सातत्याने जिवंत ठेवणारे ज्येष्ठ रंगकर्मी, बालनाट्य लेखक व दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या निवडक बालनाट्य संहितांचे पुस्तक प्रकाशन आज (दि. ८) सायंकाळी ६ वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृहात होणार आहे. या विशेष सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते पुष्कर श्रोत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आजवर ४५ हून अधिक बालनाट्ये तसेच एक दोन अंकी बालनाट्य लिहून बालमनाचे भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या लेखनातून अभिनयाचे धडे घेतलेले अनेक बालकलावंत आज चित्रपटसृष्टी आणि व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवत आहेत. त्यांच्या या वैचारिक आणि सर्जनशील योगदानाला ग्रंथरूप देण्यासाठी शहरातील ‘श्रेयस प्रकाशन’तर्फे त्यांच्या निवडक संहितांचे प्रकाशन करण्यात येत आहे.
या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते पुष्कर श्रोत्री, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, भूगर्भशास्त्रज्ञ सौ. संपदा जोशी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास शहरातील रंगकर्मी, बालकलावंत, नाट्यरसिक तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजिका अंजली धारु, श्रेयस प्रकाशनच्या डॉ. श्रद्धा पाटील तसेच बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
Jalgaon Cultural News







