साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | यावल गावातील स्वस्त धान्य दुकानाविषयी दिलेल्या तक्रार अर्जाची दखल न घेतल्यामुळे दारुच्या नशेत असलेल्या इसमाने तहसील कार्यालयात धिंगाणा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावलच्या तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान तालुक्यातील सौखेडासीम येथील सुनील नथू भालेराव हे आले. त्यांनी यावल येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे गोदाम व्यवस्थापक वाय. डी. पाटील यांना दारूच्या नशेत शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
यावेळी तहसील कार्यालयात यावल तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक असल्याने व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दारूड्या व्यक्तिने घातलेला गोंधळ बघण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. याबाबतची तक्रार गोदाम व्यवस्थापक वाय. डी. पाटील यांनी येथील पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सुनील भालेराव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.