Combing operation | साक्षीदार न्यूज | गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे गुरुवारी (९ ऑक्टोबर) पहाटे मोठ्या प्रमाणावर “कॉम्बिंग ऑपरेशन” राबविण्यात आले. ‘वॉश आऊट’ या विशेष शोध मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ८४ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पहाटे ३ ते सकाळी ६ पर्यंत मोहीमही कारवाई पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव शहरातील जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका, आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबवण्यात आली. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या देखरेखीखाली हे ऑपरेशन पार पडले.
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचा सहभागकारवाईत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी व पथकांनी सहभाग घेतला.जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर , एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बबन आव्हाड , शहर पोलिस ठाण्याचे सागर शिंपी ,जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे , रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ , शनी पेठ पोलिस ठाण्याचे कावेरी कमलाकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि स्थानिक पोलिस पथकांनी एकत्रितपणे ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
विविध गुन्हेगारांवर कारवाईया कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या ८४ जणांमध्ये हद्दपार आरोपी, फरार गुन्हेगार, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे व दारू विक्रेते अशांचा समावेश आहे. या सर्वांवर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच, विनापरवानगी शहरात दाखल झालेल्या हद्दपार गुन्हेगारांवरही स्वतंत्र कारवाई करण्यात येत आहे.जळगाव पोलिसांनी केलेल्या या एकत्रित छापेमारीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अशा कारवाईंमुळे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचेही निरीक्षकांनी सांगितले.