साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | देशातील दिल्ली या ठिकाणी गेल्या महिन्यात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर आता दि.२० रोजी पहाटेच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत व औंढा नागनाथ तालुक्यातील सुमारे 20 ते 25 गावांमध्ये पहाटे पाच वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भुकंपाची 3.5 रिश्टरस्केल एवढी नोंद झाल्याचे प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. या संदर्भात नुकसानीची माहिती घेण्याचे आदेशही देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
हिंगोली जिल्हयात मागील पाच ते सहा वर्षापासून भूगर्भातून आवाज येणे व भूकंपाचे सौम्य धक्के बसण्याचे प्रकार सुरु आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, आमदरी, फुलदाभा, असोला, कंजारा, टेंभुरदरा, पुर वसमत तालुक्यातील कुपटी, वापटी, पांगरा शिंदे, कोठारी यासह परिसरातील गावांचा समावेश आहे. जमिनीतून होणारा गडगडाट ऐकून गावकरी घराबाहेर पडतात अन् काही वेळानंतर वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा गावकरी आपापल्या कामाला लागतात. मात्र भूगर्भातून नेमका आवाज का येतो आहे? याचे गुढ अद्यापही उकलल्या गेले नाही.
दरम्यान, आज पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी औंढा नागनाथ तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला. अचानक घराच्या खिडक्या, दरवाजे वाजू लागले तर काही ठिकाणी घरात फळीवर ठेवलेले भांडे खाली पडले. यावेळी साखर झोपेत असलेले गावकरी घाबरून घराबाहेर पडले. पांगरा शिंदे गावाचा परिसर या भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे.