साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक राज्यात अनेक धार्मिक स्थळ असून लाखो भाविक दर्शनासाठी नेहमीच जात असतात पण काही ठिकाणांचा समावेश आहे, जिथल्या अनोख्या मान्यता ऐकून लोक हैराण होतात. अशाच एका बाबांच्या मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत. मध्यप्रदेशच्या जबलपूर भागात भोले कुटी नावाने एक प्रसिद्ध मंदिर आहे.
इथले रहिवासी भोले बाबा दिव्यांग होते. ते आपल्या हाताने कोणतंही काम करू शकत नव्हते, शिवाय त्यांना बोलताही यायचं नाही. ते आपली सगळी कामं पायानेच करायचे. जी व्यक्ती त्यांच्याकडे समस्या घेऊन जायची तिला ते समस्येवर चुटकीसरशी उपाय सांगायचे. ते एका झाडाखाली बसायचे. तिथे लोक त्यांना जीवनापयोगी वस्तू नेऊन द्यायचे. हळूहळू त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली.
भाविकांच्या समस्या ऐकून बाबा त्यावर पायाने लिहून उपाय सांगत असत. शिवाय ते पायाने ज्या भाविकाला आशीर्वाद देत त्यांची इच्छा पूर्ण होत असे. बाबा जिथे बसायचे तिथेच त्यांचं मंदिर बांधण्यात आलं. या मंदिरात आजही अखंड ज्योत लावली जाते. शिवाय कोजागिरी पौर्णिमेला इथं मिळणाऱ्या चमचाभर खिरीसाठी दूरदूरहून भाविक दाखल होतात. कारण या खीरीमुळे आजार बरे होतात, अशी मान्यता आहे.
लोक म्हणतात की, बाबा महादेवांचे भक्त होते. लोक त्यांना महादेवांचाच अंश मानायचे. बाबांच्या पायांचा स्पर्श होताच आजारपणही दूर होत असे. देश-विदेशातून भाविक त्यांच्या दर्शनाला येत असत. शिवाय इच्छापूर्तीनंतर इतर भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करत असत. महत्त्वाचं म्हणजे बाबा भाविकांना उपाय सांगताना कोणत्याही प्रकारची दक्षिणा घ्यायचे नाहीत, तर ते केवळ महादेवांच्या प्रार्थनेत तल्लीन असायचे.