साक्षीदार |२५ नोव्हेबर २०२३ | रस्त्याने पायी जात असलेल्या पादचारी वृद्धाला रिक्षाने धडक दिल्याची घटना दि. १६ रोजी जिल्हा रुग्णालयासमोर घडली होती. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होवून जखमी झालेल्या पोपट बाबूराव भोजणे (वय ६८, रा. जोशी कॉलनी) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जोशी कॉलनीत पोपट भोजणे हे वृद्ध कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दि. १६ रोजी सकाळच्या सुमारास भोजणे हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोरुन पायी जात असतांना, अज्ञात रिक्षा चालकाने त्यांना धडक दिली. यामध्ये भोजणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय हमहाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. १७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.