साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री पदावर इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अपात्रतेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक गृहितक म्हणून सांगतो की, एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवलं तरी ते मुख्यमंत्री राहू शकतात. ते विधान परिषदेवर येतील पण ते अपात्र होणारच नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र होतील, असा तर्क लावणं चुकीचं आहे. आमच्याजवळ अशी संख्या आहे, ज्यामुळे कुणीही अपात्र झालं तरी आम्हाला काही अडचण नाही. पण आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून काम केलं आहे. कुठेही कायद्याची चौकट आम्ही तोडली नाही. जी काही केलंय ते कायदा पाहून आणि नियमांत बसेल असंच केलं आहे. त्यामुळे आम्हाला काहीही भीती नाही.”