साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | देशातील अनेक राज्यात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना आणखी एक संतापजनक बातमी भोपाळमधून समोर आली आहे. दोन नराधमांनी पतीच्या नजरेसमोरच पत्नीवर सामूहिक अत्याचार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या मुंगोली रेल्वे स्थानकावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांची ट्रेन होती. मात्र, उशीर झाल्याने ट्रेन चुकली. त्यामुळे रात्री उशीरा ते दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत थांबले होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले. आपण रेल्वे पोलीस असल्याचं सांगत आरोपींनी त्यांच्याकडे तिकीट दाखवण्याची मागणी केली. दोन्ही व्यक्ती सिव्हिल ट्रेसमध्ये असल्याने महिलेच्या पतीला संशय आला. त्यांनी आरोपींना तुमचे ओळखपत्र दाखवा मगच आम्ही तिकीट दाखवतो असे सांगितले. यावरून दोघांनीही महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. यातील एकाने महिलेला शेजारी असलेल्या झुडूपात नेले. तिथे आरोपीने महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे जेव्हा आरोपी महिलेवर बलात्कार करीत होता. तेव्हा दुसरा आरोपी पतीला ते दृश्य दाखवत होता. दरम्यान, दुसऱ्या आरोपीने देखील महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला. या घटनेनंतर महिला आणि तिच्या पतीने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून मुंगोली पोलिसांनी अज्ञात आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.