Evm Hacking साक्षीदार न्युज । इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) हॅक करून निवडणूक निकालांमध्ये हेरफेर शक्य असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संचालक तुलसी गब्बार्ड यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतासह जगभरातील ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गब्बार्ड यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत सांगितले की, ईव्हीएम सहजपणे हॅक होऊ शकतात आणि याबाबत ठोस पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी बॅलेट पेपरवर आधारित मतदान पद्धती अवलंबण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले.
भारतात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. विरोधी पक्षांनी वारंवार ईव्हीएम हॅकिंग आणि निकालांमध्ये हेरफेर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गब्बार्ड यांच्या दाव्याने या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. यापूर्वी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले होते. गब्बार्ड यांनी अमेरिकेतील 2020च्या निवडणुकीच्या संदर्भातही ईव्हीएमच्या वापराबाबत शंका व्यक्त केली असून, यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने गब्बार्ड यांच्या दाव्याला उत्तर देताना भारतातील ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. आयोगाच्या म्हणण्यानुसार, भारतीय ईव्हीएम इंटरनेट किंवा कोणत्याही नेटवर्कशी जोडलेली नसतात आणि ती स्वतंत्रपणे कार्य करतात. त्यामुळे त्यांना हॅक करणे अशक्य आहे. आयोगाने भारतातील ईव्हीएमची तुलना परदेशातील ईव्हीएमशी करणे चुकीचे असल्याचेही म्हटले आहे.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी गब्बार्ड यांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन तपासाचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. गब्बार्ड यांच्या वक्तव्यानंतर बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
निवडणूक प्रक्रियेवर मतदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शक पद्धती आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गब्बार्ड यांच्या दाव्याने भारतातील निवडणूक प्रणालीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, येत्या काळात याबाबत काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.