साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | राज्यात दिवाळीची धामधूम सुरु असतांना मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. आग आटोक्यात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील गाझधर बंध मार्गावरील फिटर गल्लीत शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास एका तळमजल्यातील घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज भयंकर असा होता, त्यामुळे तळमजल्यावरील रहिवाशी भयभीत झाले. या आगीच्या ज्वाळा विजेच्या संपर्कात आल्यामुळे आग अधिकच वाढू लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ६ वाजून ४० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत निखिल दास (वय ५३), राकेश शर्मा (वय ३८), अँथनी थेंगल (वय ६५), कालीचरण कनोजिया (वय ५४) आणि शान सिद्दिकी (वय ३१) हे पाचजण गंभीररीत्या भाजले असून त्यांना नजीकच्या डॉ. होमी भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.