Cm Relief Fund Scam साक्षीदार न्युज । कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयाच्या चालकासह दोन अन्य व्यक्तींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४ लाख ७५ हजार रूपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १३ काल्पनिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया आणि उपचारांचे बनावट दस्तऐवज तयार करून निधी उकळण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात उघड झाले. हा प्रकार २६ मे ते १० जुलै २०२३ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे सहाय्यक संचालक देवानंद धनावडे (५०) यांनी गुरुवारी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रुग्णालय चालक डॉ. अनुदुर्ग ढोणी (४५, रा. आंबिवली), प्रदीप पाटील (४१, रा. कल्याण-पश्चिम) आणि ईश्वर पवार (रा. धुळे) या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यता निधी कक्षाच्या तपासात या कागदपत्रांचा बनावट स्वरूपाचा संशय आल्यानंतर प्रकरण ठाण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. तपासात बनावट कागदपत्रांचा वापर करून निधी हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारीनुसार, डॉ. ढोणी यांच्या आंबिवलीतील गणपती मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात १३ रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि उपचार झाल्याचे दाखवून बनावट प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने रुग्णालयाच्या बँक खात्यात ४.७५ लाख रूपये जमा केले. मात्र, नंतरच्या तपासात हे सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे समोर आले. या घोटाळ्याचा उलगडा झाल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली असून, पोलीस उपनिरीक्षक मनोहर घुगे यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे प्रशासनातील निधी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, बनावट कागदपत्रांचा वापर करून सार्वजनिक निधी हडपण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिस तपास अहवालानुसार, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे, सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन जपावा महाराष्ट्रधर्म’
मातेचे अनैतिक कृत्य: मुलीच्या सासऱ्यासोबत पळून गेली, कुटुंबाची नाचक्की
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे युतीचे संकेत: भांडणं मिटवली, पण …