Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आणि घरातील अन्नधान्य देखील वाहून गेले. या संकटाच्या काळात शेतकरी हवालदिल झाले असताना त्यांना प्रशासनाकडून आधाराची अपेक्षा आहे. परंतु, जिल्हा कृषि विभागाची भूमिका मात्र शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.
अलीकडेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा प्रमुख उद्देश म्हणजे नुकसानीचे सर्वेक्षण, शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचे नियोजन आणि तातडीने पुनर्वसनाची दिशा ठरवणे अपेक्षित होते. मात्र, बैठक अधिकृतरीत्या दुपारी संपल्यानंतर काही अधिकारी थेट शेतकऱ्यांकडे जाण्याऐवजी निवांत बसून एका खाजगी हॉटेलमध्ये गळ्यात आय कार्ड धारण करून दुपारचे जेवण आणि निवांत गप्पांचा आनंद घेत होते.
हे सर्व दृश्य आजूबाजूच्या बसलेले लोक देशील विचार करीत होते जर ह्या परिस्थितीत हे अधिकारी असे वागत असतील तर सामान्य वेळेस हे काय शेतकऱयांच्या व्यथा एकत असतील . उद्या होणाऱ्या पालक मंत्र्याच्या बैठकीत पालक मंत्री यावर बोलतील काय हे या कडे सर्वसामान्यांचे लक्ष लागुण आहे .
या संपूर्ण प्रकारा बाबत आम्ही जिल्हा कृषी अधिकारी तडवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन घेणं टाळलं .
एका बाजूला शेतकरी आपले संसार वाहून गेल्यामुळे हताश झाले आहेत. शेतीसाठी घेतलेली कर्जे, पिकांचे नुकसान, आणि घराचे झालेले विदारक चित्र पाहून ते मानसिकदृष्ट्याही खचले आहेत. अशावेळी कृषि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर द्यायला हवे होते, त्यांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष ऐकले पाहिजे होते. परंतु, याउलट परिस्थिती दिसून आली असून बैठकीच्या नावाखाली वरिष्ठ अधिकारी कार्यालयीन वेळेत टाईमपास करण्यात गुंतल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “आमचे संसार वाहून गेले, शेतात उभे असलेले पीक नष्ट झाले, येणारे दिवस कसे पार करायचे या चिंतेत आहोत, आणि शासनाचे अधिकारी मात्र टाईमपास करत आहेत”, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली व्यथा व्यक्त केली.
जिल्ह्यातील कृषि विभागावर आधीच शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात वेळेवर कारवाई न केल्याबद्दल टीका होत होती. आता या घटनेमुळे विभागाच्या कार्यपद्धतीवर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांचे तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत पोहोचवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
शेतकरी हवालदिल असताना कृषि विभागातील निष्क्रियता आणि निष्काळजीपणा यामुळे प्रशासनावरील लोकांचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. अशा वेळी अधिकारी हॉटेलमध्ये निवांत असल्याचे उघडकीस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या ओघळलेल्या डोळ्यांवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.