साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३ | राज्यात येत्या आठवड्याभरावर दिवाळी हा सण आला असून अनेक शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार असल्याचे दिसत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये सरकारने कांदा उत्पादकांना जाहीर केलेल्या अनुदानातील शिल्लक ८४ कोटी एक लाख रुपयांची रक्कम तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचाही समावेश आहे. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील निराधारांना ३ कोटी ८१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात येणार असल्याने दोघांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल, जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले होते.
अनुदानापोटी पाचशे पन्नास कोटी इतकी रक्कम पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून सदर चारशे पासष्ट कोटी, नव्व्यान्नव लाख वितरीत करण्यास यापूर्वी वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे. कांदा अनुदान वितरणासंदर्भात आयसीआयसीआय बँकेकडून दोन टप्प्यात ४५२ कोटी २५ लाख ६८ हजार ६९२ इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. तांत्रिक बाबींमुळे देयक नाकारलेल्या व कार्यवाही सुरू असलेल्या नोंदीसाठी २४ कोटी ९२ लाख १९ हजार ७६२ इतकी रक्कम अदा करणे बाकी आहे. पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या पाचशे पन्नास कोटी रुपये या रकमेपैकी ८४ कोटी, एक लाख इतका उर्वरित निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने नुकतीच मान्यता दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.