उप विभागीय पोलीस अधिकारी गेले सुटीवर
Jalgaon People Bank चोपडा । साक्षीदार न्यूज । दी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सागर ओतारी यांनी दि. 14 ऑगस्ट पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू केलेले आमरण अन्नत्याग उपोषण सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. या उपोषणाला संपूर्ण चोपडा शहरातून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषण स्थळी भेट देत पोलीस प्रशासनास जाब विचारीत आहे. तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपोषण स्थळी भेट देऊन पोलीस प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील
14 ऑगस्ट 2025 पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू झालेल्या या उपोषणाला उपोषणकर्ते सागर काशिनाथ ओतारी यांनी “न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्य दिनीही न्यायाची याचना
15 ऑगस्ट सारखा राष्ट्रीय सणाच्या दिवशीही अन्यायाविरोधात उपोषणाला बसावे लागते, आणि न्यायाची याचना करावी लागते ही एक शोकांतिका असल्याचे मत उपोषणास भेटी देणाऱ्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. हे पोलिस प्रशासनासाठी नामुष्कीचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सर्व सामान्य जनतेमधून उमटत आहेत.
नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा
उपोषणाला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, चोपडा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. उपोषण स्थळी कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे तरी देखील उपोषण लोकशाही मार्गाने शांततापूर्ण वातावरणात सुरु आहे.
मा. उच्च न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळल्याने गुन्हा दाखल करण्याचा मार्ग झाला होता मोकळा
दि. 26 एप्रिल 2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन ला दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर अद्याप गुन्हा नोंदविला गेलेला नाही. सदर फिर्याद दाखल होऊ नये म्हणून बँकेने मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन क्र. 798/2025 दाखल केली होती. त्यावर दि. 24 जून 2025 रोजी मा. उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी मा. उच्च न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळत असल्याचे सांगिताच बँकेतर्फे वरिष्ठ ऍड. एस बी देशपांडे व ऍड तपन संत यांनी याचिका मागे घेत असल्याचे सांगितल्यावर मा. उच्च न्यायालयाने सदर याचिका रद्द केली. तरी देखील पोलिसांनी गुन्हा नोंदविला नसल्याने पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. यामुळे बँकेला पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेला न्यायापासून वंचित ठेवल्याचा निषेध व्यक्त होत आहे.
तपास अधिकाऱ्यांचा प्रस्ताव रखडला
सदर प्रकरणातील तपास अधिकारी आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सदर प्रकरणी तपास पूर्ण करून मा. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे बँकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार लेखी परवानगी मागितली होती. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी असमाधानकारक कारणे देत गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिलेली नाही.
पोलिस प्रशासनाने चोपडा वासियांचा विश्वास गमावला
पोलीस प्रशासनाच्या अन्यायाला साथ देण्याच्या भूमिकेमुळे पोलिस प्रशासनावर जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे मत व्यक्त होत आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच उपोषणस बसावे लागते तर सामान्य जनतेचे काय हाल होता असतील अशी प्रतिक्रिया वेंडर पुरुषोत्तम साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
उपोषणकर्त्यांच्या मागण्या
संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करावी.
अन्यायाला पाठबळ देणाऱ्या व जळगाव पीपल्स बँकेला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व जबाबदार यांची चौकशी करावी.
उपोषणार्थी सागर ओतारी यांची प्रकृती खालावली
उपोषणार्थी सागर ओतारी यांची प्रकृती खालावली असून दिवसातून सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक उपोषण स्थळी येऊन तपासणी करीत आहे. प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकाने उपचारार्थ उप जिल्हा रुग्णालयात दाखल व्हा, असे सागर ओतारी यांना सांगितले. मात्र श्री ओतारी यांनी दाखल होण्यास व कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे.