साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | राज्यात गेल्या १५ दिवसांपासून पुणे येथील ड्रग्ज तस्कर ललित पाटील फरार होता अखेर त्याला टक करण्यात आली असून मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. लवकरच त्याला महाराष्ट्रात आणलं जाणार असून कोर्टात हजर केलं जाणार आहे. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी १० पथकं तयार करण्यात आली होती.
चेन्नई येथे ललित पाटील हा लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. त्याला आता पुण्यात आणलं जाणार असून कोर्टात सादर करण्यात येणार आहे.
ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले.