साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील टोलमुद्यावर नेहमीच मनसे आक्रमक होत आंदोलन करीत असतात, एका आंदोलनाप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह १२ मनसैनिकांना अटक केल्यानंतर आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलंड टोलनाक्यावर प्रतिकात्मक आंदोलन केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक देखील केली होती. मात्र, सोमवारी रात्री उशीरा अविनाश जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दुसरीकडे, मुलुंड टोल नाका पेटविणाऱ्या रोशन वाडकर या मनसे पदाधिकाऱ्याला आयपीसी कलम ४३६ आणि डेमेज पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट कलम ३,४ कलमांतर्गत अटक झाली आहे. दरम्यान, जामीनावर बाहेर येताच अविनाश जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“आम्हाला अटक केल्यापेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जो व्हिडीओ दिला होता, जी स्टेटमेंट दिली होती. त्याचं पालन जर महाराष्ट्र पोलिसांनी केलं असतं, तर आम्हाला अटकच करावी लागली नसती”, असं अविनाथ जाधव यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना अविनाथ जाधव म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, की महाराष्ट्रातील सर्व टोलकानाक्यावरुन चारचाकी आणि इतर हलक्या वाहनांकडून कुठलाही टोल वसुल केला जाणार नाही. तर आम्ही काय चुकीचं केलं? देवेंद्र फडणवीस जे बोलले तेच आम्ही करत होतो, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.काही दिवसांपासून मुंबई तसेच महाराष्ट्रातील टोलनाक्यावर टोल दरवाढी करण्यात आली. या दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारी सकाळी राज ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत काही विधाने केली. त्यानंतर टोलनाक्यांवर दुचाकी व चारचाकी वाहने विनाटोल सोडून देण्याची मागणी करत मनसैनिकांनी अनेक टोलनाक्यांवर ठाण मांडले.