साक्षीदार | ११ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील खडकेचाळ येथे किरकोळ कारणावरून रिक्षाचालक तरुणासह त्याच्या पत्नीला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. ८ रोजी बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजीनगर येथील खडकेचाळ येथे प्रविण मधुकर मराठे हे त्यांच्या पत्नी बेबी प्रविण मराठे यांच्यासह वास्तव्याला असून रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करतात. बुधवारी प्रविणच्या घरासमोर गल्लीतील काहीजण अंगणात उभे राहून शिवीगाळ करीत होते. याचा जाब प्रविण मराठे याने विचारल्याच्या रागातून याच परिसरात राहणारे संशयित उमेश मांडोळे, भूषण उमेश मांडोळे, देवेंद्र उमेश मांडोळे आणि किर्ती उमेश मांडोळे यांनी प्रविण मराठे याला बेदम मारहाण करून दुखापत केली. हे भांडण सोडविण्यासाठी प्रविणची पत्नी बेबी मराठे आली असता संशयितांनी त्यांनादेखील मारहाण करून दुखापत केली. या घटनेप्रकरणी गुरूवारी जळगाव शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित उमेश मांडोळे, भुषण उमेश मांडोळे, देवेंद्र उमेश मांडोळे आणि किर्ती उमेश मांडोळे (सर्व रा. खडकेचाळ, जळगाव ) यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मिलींद सोनवणे करीत आहे.