नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक राज्यात लग्नाची धामधूम सुरु असतांना एक परिवार लग्न समारंभ आटोपून परतत असताना भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना झारखंडमधील गिरिडीहमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात सगीर अंसारी, युसूफ मियां, इम्तियाज अंसारी, सुभान अंसारी, अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरिडीह जिल्ह्यातील थोरिया येथील मृत व्यक्ती रहिवासी आहेत. ते गुरुवारी तिकोडीह येथे नातेवाईकाच्या विवाह समारंभारासाठी गेले होते. विवाह समारंभाचा कार्यक्रम आटोपून कारने परतत असताना बागमारा पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आत कार अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळली. या भयानक घटनेत कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.








