साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | ऑनलाईन अॅपवर रिक्वेस्ट पाठवून वनरक्षक असलेल्या महिलेसोबत चॅटींग करुन त्यांचा विश्र्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळया माध्यमातून त्यांच्याकडून ४ लाख ८९ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेत त्यांना गंडविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चोपडा तालुक्यात ३३ वर्षीय रोशनी सहदेव झटाले या वास्तव्यास असून त्या वनरक्षक म्हणून नोकरीस आहे. दि. २६ जुलै ते दि. २३ सप्टेंबर दरम्यान, त्या वनरक्षक महिलेला डॉ. सतिष अमितव पेमा असे नाव असलेल्या इसमाने इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करुन जिवनसाथी या ऑनलाईन ॲपवर रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर महिलेसोबत ओळख निर्माण करीत त्यांच्यासोबत व्हाट्स अॅप व जीमेलवर चॅटींग करु लागला. यामध्ये त्यांने महिलेचा विश्वास संपादन करुन त्यांना वेगवेगळी कारणे सांगून कल्पना कश्यप या उत्तप्रदेशातील महिलेच्या नावावर वनरक्षक महिलेकडून ४ लाख ८९ हजार रुपये स्विकारीत त्यांची आर्थीक फसवणुक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने लागलीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.