जळगाव : –एका ट्रॅक्टर चालक तरुणाने शेतात असलेल्या झाडाला गळफास घेत जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षल विश्वनाथ चौधरी (वय २३, रा. गढोदा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे हर्षल चौधरी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गावात ट्रॅक्टर चालवून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता, सोमवार दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हर्षल याने देवगाव ते किनोद रस्त्यावरील मंगल पाटील यांच्या शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.








