साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | सध्या राज्यभर आपल्या नृत्याने अनेकांना वेड लावलेल्या गौतमी पाटील हि आता मोठ्या अडचणीत आली आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमावर बंदी येत असल्याने अनेक चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.
महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात अथवा गावात गौतमीचा कार्यक्रम असतो तिथं कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद होत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरात गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरुन वाद झाला होता. त्यानंतर आता सोलापूरात देखील वादाला सुरुवात झाली आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांता कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाला विरोध झाला होता. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातही तोच प्रकार दिसून आला आहे. सोलापूर पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. गौतमीच्या कार्यक्रमाच्या वेळी होणारी हुल्लडबाजी, गोंधळ यामुळे पोलिसांवर येणारा ताण हे यामागील कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूरात पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे गौतमीच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी ही सोलापुरातील एका डिस्को दांडियाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होती. त्या कार्यक्रमालाच पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं प्रेक्षक आणि चाहते यांचा हिरमोड झाला आहे. सोलापूरातील विजापूरनाका पोलिसांनी ही भूमिका घेतल्याची माहिती आहे.