साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटाका बसला आहे. पंढरपूर तालुक्यात ११ हजार एकरावरील द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात 23 मिलिमीटर इतका पाऊस झाला. या पावसामुळे फ्लोरिंग मध्ये आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे. त्याशिवाय भुरी, दावण्या या रोगांचा ही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्याने आज सकाळ पासूनच शेतक-यांनी फवारणी सुरू केली आहे. पंढरपूर तालुक्यात 11 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पिक घेतले जाते. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.