परिक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा : एसडी-सीड कार्यशाळेत मान्यवरांचे प्रतिपादन
सुमारे १२० विद्यार्थ्यांनी घेतला कार्यशाळेचा लाभ
जळगाव (सुनिल भोळे) : – विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आत्मसात होण्याच्या दृष्टीने एसडी-सीडच्या माधमातून वर्षभरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा तसेच शिबिरांचे आयोजन केले जात असून एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व कार्याध्यक्षा मिनाक्षीताई जैन या योजनेच्या यशस्वीतेसाठी नेहमीच तत्पर असतात.
दहावीच्या परीक्षा लवकरच सुरु होतील अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्व तयारी योग्य पद्धतीने करता यावी तसेच विद्यार्थ्यांना बारावी नंतर योग्य करिअर निवडण्यासाठी सी.ई.टी. परीक्षे संदर्भात जागरुकता यावी या उद्देशाने एसडी-सीड तर्फे “परीक्षेची पूर्व तयारी” व अचूक सी.ई.टी. परीक्षा मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालय व इकरा शाईन कनिष्ठ विद्यालय जळगाव येथे करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी श्री नंदलाल गादिया हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते.
वाढत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आव्हानांसाठी सदैव तत्पर राहावे व परीक्षा कोणत्याही प्रकारची असो तिला आत्मविश्वासाने सामोरे गेले की, परीक्षेचा ताण येणार नाही असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यशाळेला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सूर्यवंशी, ईकरा ज्युनिअर कॉलेजचे प्रा. जाकीर सर, प्रा. अमीर सोहेल, एसडी-सीड समन्वयक प्रविण सोनवणे, श्री गिरीश जाधव, सौ. अलका महाजन , सौ. रत्ना चोपडे, सौ. अनिता शिरसाठ हे उपस्थित होते.
जास्तीत जास्त PYQ (मागील वर्षांमध्ये झालेल्या प्रश्नोत्रिका) सोडवा. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ..या सर्व स्पर्धा परीक्षा सिलेक्शन नसून रिजेक्शन एक्झाम असतात …संकल्पांच्या स्पष्टीकरणांवर भर द्यावा … भरपूर सराव परीक्षा द्याव्यात. तसेच सीईटी परीक्षेचा अभ्यास कसा करावा, कोणत्या विषयाच्या अभ्यासावर जास्त भर द्यावा, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा अशा महत्वपूर्ण टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्यात.
योग्य परीक्षेची निवड व नीट, सी.ई.टी. यासारख्या परीक्षाही सहज चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी खालील बाबी सांगितल्या त्यात प्रामुख्याने,
• आपण सीईटी का देतो, त्यामागे आपले निच्छित ध्येय काय आहे हे सर्वप्रथम ठरवा.
• त्यासाठी आपल्याला उपलब्ध साधने कोणती हे निश्चित केले पाहिजे.
• आपल्याला मेडिकलला जायचे आहे की इंजिनिअरिंगला ते ठरविले पाहिजे.
• अभ्यासाचे नियोजन करायला पाहिजे.
• अभ्यासाचे तास वाढवा
• अभ्यास करतांना वेगवेगळ्या आकृत्यांचा संदर्भ घ्यावा.
• स्वतःच्या नोट्स स्वतः तयार कराव्यात.
या ठळक मुद्यांचा अभ्यास अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सोनेरी भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षांना गंभीरपणे सामोरे जाणे आवश्यक आहे परंतु त्याचा बाऊ होता कामा नये हे सुद्धा तेवढेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षेत काही कारणास्तव अपयश मिळाले तर ते पचविण्याची क्षमता ही विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये विकसित करावी व पुन्हा जोमाने प्रयत्न करून यश संपादन करावे असेही सांगितले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक व व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.