साक्षीदार न्युज । ७ फेब्रुवारी २०२४ । जळगाव वाहन चालविताना आपला व समोरच्या व्यक्तीचा जीव अनमोल आहे त्यासाठी नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवावे असे मोलाचे मार्गदर्शन जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहकारी मनीष देवरे आणि श्रध्दा महाजन यांनी केले. एमआयडीसीमधील मंजुश्री टेक्नोपॅक येथील सहकाऱ्यांसमोर रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पोवांड्याच्या माध्यमातून लोकशाहीर जोशी प्रतिष्ठानचा जनजागृती उपक्रम आयोजण्यात आला होता.

रस्ते अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. त्या बाबत जनजागृतीच्या दृष्टीने जळगाव येथील आर टी ओ कार्यालय आणि लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. आरंभी कु. संहिता संदीप जोशी हिने बासरीवर राष्ट्रगान वाजविले. प्रतिष्ठानतर्फे शाहीर स्व. दिलीप जोशी यांचे सुपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी, सचिव संदीप जोशी, संहिता, हेमांगी आणि सहकारी यांनी रस्ता सुरक्षा विषयावर अतिशय बोधपूर्ण पोवाडा सादर केला. जमलेल्या सगळ्यांना रस्ता सुरक्षा नियमांची शपथ देण्यात आली, सगळ्यांनी अगदी मनापासून नियम पाळण्याचे वचन दिले. शामकांत निकुंभ, श्री दिगंबर महाजन , गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी मदन लाठी , निखिल बोरसे यांचे देखील अमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन कार्यक्रमासाठी मिळाले. मंजुश्री टेक्नोपॅकचे श्री साहू सर, श्री शर्मा सर , संदीप कुलकर्णी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमूल्य सहकार्य मिळाले.