साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार असून हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली असून निधी वाटपावरुन दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“सात तारखेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्याआधी सहा डिसेंबरला महाविकास आघाडीची बैठक घेऊ. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत, ते सोडवले जातील अशी अपेक्षा आहे,” असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. तसेच निधीवाटपावरुन दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. “हाजीर तो वजीर अशी सध्याची सध्या परिस्थिती आहे. जो मंत्रालयात जातो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे मिळवतो. सत्ताधारी आमदारांमध्येच ही स्पर्धा असून समान निधीचं वाटप होत नाही. सरकारमधल्या पक्षांमध्येच असमानतेचं धोरण आहे. बाकी विरोधकांचं तर विचारायलाच नको…” असे जयंत पाटील म्हणाले.