साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असतांना एक ह्रदयद्रावक घटना गुजरातमध्ये घडली आहे. सुरतमध्ये सेप्टिक टँकमध्ये काम करताना गुदमरून चार स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. पलसाणा-काटोदरा रोडवर असलेल्या एका गारमेंट डाईंग कारखान्यात ही घटना घडली. कारखान्यात असलेल्या सेप्टिक टँकची साफसफाई करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळी उशिरा सूरतच्या पलसाना येथील कारखान्यात सेप्टिक टँक साफ करताना गुदमरल्यामुळे दोन प्रवासी मजूर बेशुद्ध पडले. दरम्यान, त्याला वाचवण्यासाठी आणखी दोन मजूरही टाकीत उतरले, मात्र त्यांचीही प्रकृती बिघडू लागली आणि तेही बेशुद्ध पडले.
घटनेनंतर सर्वांना तातडीने टाकीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषीत केले. हे चारही मृत तरुण बिहारचे रहिवासी आहेत. आम्ही कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करत आहोत आणि प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.तसेच “आम्हाला बुधवारी सकाळी साडेसहा वाजता याबाबत माहिती मिळाली. जेव्हा आमचं पथक घटनास्थळी दाखल तेव्हा गुदमरुन मृत्यू पावलेले ४ मृतदेह आढळले. हे चारही मजूर फॅक्टरी शेजारीच वास्तव्यास होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे. ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.