साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील २३ वर्षीय विवाहित महिलेला घरी बोलवत तिच्याशी हुज्जत घालून विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात संशयित आरोपी डिगंबर ऊर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा. निवृत्तीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिल्हा पेठ परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेशी डिगंबर चौधरी याने २३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. मला सर्व मिटवायचे असून, तू घरी ये असे सांगून दुपारच्या वेळेस घरी बोलविले. ही महिला त्याच्या घरी गेली असता काही समजण्यापूर्वीच त्याने महिलेच्या तोंडावर मारले व तिचा विनयभंग केला. तू मला हवी आहेस असा तो ओरडू लागल्याने चौधरी याची आई व भाची घरातून बाहेर आले. महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तिचे कपडेही या तरुणाने फाडले. याप्रकरणी महिलेने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डिगंबर ऊर्फ सुनील चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना चौधरी करीत आहेत.